शिरोळ : शिरोळ तालुक्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. माजी आमदार उल्हास पाटील हे आमदार यड्रावकर यांच्याबरोबर एकत्रितपणे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकासह आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांसह येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी आमदार यड्रावकर व आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एकत्र आलो असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्रितपणे काम करणार करणार आहे.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा विकास घोडदौड सुरू आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांसह येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी उल्हास पाटील आणि आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शिंदे सेनेच्या माध्यमातून तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, आमदार यड्रावकर यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्क्यावर - धक्के देत असल्याने आगामी काळात आणखीन कोण यांच्या बरोबर जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी अमरसिंह पाटील, धनाजीराव जगदाळे, दादासाहेब काळे, माजी सभापती कमरुद्दीन पटेल, हैदर मेस्त्री यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व उल्हास पाटील गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.