शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमलाबाई विठ्ठल चौगुले (वय ६०, रा. टाकवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास येथील कलेश्वर हायस्कूलजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई चौगुले या नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतातून घरी परतत होत्या. त्यावेळी कलेश्वर हायस्कूल रस्त्यावरील टॉवर शेजारी अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, संबंधित रस्ता अपघातप्रवण ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या असून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरात योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे