Shiroda Beach Youth Dead Body Found
गडहिंग्लज : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात मंगळवारी (दि.२) सायंकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या गडहिंग्लज येथील पर्यटकांपैकी एक पर्यटक विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
प्रणय ज्ञानेश्वर देवमाने (वय २१, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह बुधलारी (दि.३) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिरोडा समुद्र किनारी दिसून आला.
पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलीस प्रसाद कदम, मांजरेकर, दीपा मटकर, वेळागर पोलिस पाटील लक्ष्मण तांडेल, सागरतीर्थ पोलिस पाटील सनी मोरजकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडये, जीव रक्षक संजय नार्वेकर तसेच आबा चिपकर, बाबल गावडे ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. किनाऱ्यावरून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र पाठविण्यात आला आहे.
गडहिंग्लज येथील सहा जण मित्र फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते. यामध्ये प्रतीक शंकर बुगडे (वय २०), दर्शन सुरेश जानवरेकर (वय २१), शिवम चंद्रशेखर मस्ती (वय १९), विघ्नेश धोंडीबा दळवी (२२), रितेश दीपक कांबळे (वय २२) आणि प्रणय ज्ञानेश्वर देवमाने (वय २१) हे शिरोडा वेळागर येथे मोटरसायकलने फिरण्यासाठी आलेले होते.
त्यामधील प्रतीक शंकर बुगडे व प्रणय ज्ञानेश्वर देवमाने हे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी उतरले. त्यातील प्रणय हा समुद्राच्या पाण्याच्या लाटेबरोबर आत ओढला जाऊन समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाला होता.