कोल्हापूर

Kolhapur news: दोन वर्षांपासून रखडलेल्या शिरढोण–कुरुंदवाड राज्य मार्गाच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी?

...निधीअभावी पाच किलोमीटरचे काम ठप्प; खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक, नागरिकांची तातडीच्या कामाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शिरढोण–कुरुंदवाड दरम्यान राज्य मार्ग क्रमांक २०० वरील सुमारे पाच किलोमीटरच्या डांबरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. या मार्गाच्या पूर्णत्वाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच थांबल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अर्धवट तयार झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांचे वारंवार अपघात होत असून प्रवास जीवघेणा बनला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा काम पूर्ण करण्याची मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता, शासनाकडून उर्वरित निधी अद्याप प्राप्त झाला नसल्याने काम पुढे नेता येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भिजत घोंगडे पडले आहे.

कर्नाटक–महाराष्ट्र सीमेला जोडणारा तसेच इचलकरंजी, नृसिंहवाडी आणि परिसरातील अनेक गावांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून उर्वरित डांबरीकरण पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.

...अपघातांचे प्रमाण वाढले

शिरढोण–कुरुंदवाड राज्य मार्गावरील मोठे खड्डे आणि त्यामध्ये साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निधीची अडचण तातडीने दूर करून रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT