शिरढोण: शिरढोण ग्रामपंचायतीतील १५ वा वित्त आयोग निधी, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वसुली खर्चातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चौकशी अहवालातील त्रुटी आणि अपूर्ण माहितीकडे गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी शिरोळचे गटविकास अधिकारी विजय परीट यांना तत्काळ सविस्तर, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राथमिक चौकशीत आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचाराचे आरोप प्रथमदर्शनी आढळून आल्याचे नमूद करण्यात आले असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच वसूलपात्र रक्कम वसूल करण्याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेला अहवाल अपूर्ण व अस्पष्ट असल्याचे ताशेरे जिल्हा परिषदेकडून ओढण्यात आले आहेत.
चौकशी अहवालातील २१ मुद्द्यांबाबत केवळ त्रुटींचा उल्लेख करण्यात आला असून त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक मुद्द्यावर नेमकी काय अनियमितता झाली, त्यासाठी जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा पदाधिकारी कोण आहेत, त्यांची नावानिशी माहिती आणि प्रस्तावित कारवाईचा तपशील तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील अंतिम अहवालानंतर दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दोषींवर कारवाईसाठी शेवट पर्यंत लढू ग्रामपंचायत मधील झालेला भ्रष्टाचार उघड करून ग्रामस्थांसमोर नक्कीच आणला जाईल. चुकीच्या पद्धतीने कारभार करून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कारवाईसाठी शेवट पर्यंत लढू.पोपटराव पुजारी, भाजप नेते