Shirdhon Gram Panchayat News
Summary :
- एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२५ कालावधीतील व्यवहारांची चौकशी बोगस बिले व निधी अपहाराचा संशय
- पंचायत समितीकडून चौकशी समिती नियुक्त
- दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत
शिरढोण : शिरढोण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीस आजपासून (दि.२४) सुरुवात झाली आहे. पंचायत समिती शिरोळ येथील विस्तार अधिकारी रवी कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती शिरढोण येथे दाखल झाली आहे. ग्रामपंचायत अधिकारी विलास फोलाने व नंदकुमार निर्मळे हे त्यांना मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. संबंधित कालावधीतील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये बोगस बिले दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चौकशी सुरू होताच संबंधितांचे धाबे दणाणले असून, गावात या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी शिरढोण येथील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन यांच्याकडे निवेदन सादर करून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही समिती आज दाखल झाली असून पुढील काही दिवस चौकशी सुरू राहणार आहे.