शिरढोण: शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांची बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्याबाबत प्रशासनाने आदेश दिलेला असतानाही प्रत्यक्षात यंत्रणा बंद असल्याची स्थिती दिसून येत आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार ग्रामसेवकांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असताना, हजेरीसाठी बसविण्यात आलेले मशीनच गायब झाल्याचे दिसून येत आहे. सध्या केवळ भिंतीवर रिकामा बॉक्स लटकत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बायोमेट्रिक हजेरी नोंदविताना नकार मिळत असल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे ग्रामसेवक कार्यालयात नियमित उपस्थित असतात का? असा सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित ग्रामसेवकांचे हालचाल रजिस्टर तपासून प्रत्यक्ष कामकाजाची पडताळणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी का होत नाही, याची चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हालचाल रजिस्टर तपासण्याची मागणी!
ग्रामसेवकांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा आदेश ग्रामविकास वनविभागाचे कक्ष अधिकारी नितीन पवार यांनी दिलेला असताना शिरढोण ग्रामपंचायतीत त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. हजेरीचे मशीनच गायब असल्याने आदेशाची अंमलबजावणी नेमकी कुठे अडली, असा सवाल आहे. हालचाल रजिस्टर तपासल्यास कामाच्या नावाखाली होणारी भटकंती स्पष्ट होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
शिरढोण येथे बायोमेट्रिक हजेरी साठी लावण्यात आलेले मशीन गायब असून केवळ भिंतीवर रिकामा बॉक्स लटकत आहे.