चंदगड : चंदगड व बेळगाव तालुक्यांच्या सीमेवरील शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या एका घरामध्ये मंगळवारी (दि. २३) भरदुपारी चार चोरट्यांकडून घरफोडी करत असताना अचानक घरमालक येताच तीन चोरटे आणि घरमालक यांच्यात धुमश्चक्री झाली. एक चोरटा हत्यार घेऊन घर मालकावर चाल करत होता. कारमध्ये बसत असताना घर मालकानेही दगडफेक केली. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. सर्व चार जण २५ ते ३० या वयोगटातील होते.
शिनोळी बुद्रुक येथे औद्योगिक वसाहत रोडवरील निखिल भरमाना बोकमूरकर यांचे घर आहे. त्यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्याने ते एकटेच असतात. ते शिनोळी बुद्रुक येथील काजू फॅक्टरीमध्ये कामावर गेले होते. दुपारी जेवणासाठी घरी आले, तर त्यांना घरामध्ये तोडफोडीचा आवाज आला. त्यांनी समोरील दरवाजा काढून आत जाण्याचा प्रयत्न करताच घरामध्ये तिघेजण लोखंडी कपाट फोडत होते.
चोरट्यांना घरामध्ये कोणीतरी आल्याची चाहूल लागताच ते विविध प्रकारची हत्यारे हातात घेऊनच बाहेर पडले. ते थेट बाहेर थांबलेल्या कारमध्ये बसून पळून गेले. तिघे चोरटे कारमधून जात असताना निखिल यांच्यावर हत्यार घेऊन धावत होते. यावेळी निखिल यांनी दगडफेकही केली. यादरम्यान शेजारी लोकवस्ती कमी असल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, चंदगडचे पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.