कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्यव्यापी दौरा करत आहेत. येत्या दि. 24 रोजी कोल्हापुरातून या दौर्याची सुरुवात होणार आहे. या निमित्तने शिंदे शिवसेना राज्यव्यापी शक्तिप्रदर्शन करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राज्यव्यापी प्रचार दौर्याची सुरवात कायम कोल्हापुरातून करत असत. राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ठाकरे यांनी अंबाबाई चरणी चांदीचे धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह अर्पण केले होते. पुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानीही हीच परंपरा कायम ठेवली. शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे शिवसेनेने विधानसभेच्या 81 जागा लढविल्या त्यापैकी 57 जागांवर यश मिळविले. लोकसभेला 15 जागा लढविल्या होत्या त्यापैकी 7 जागांवर यश मिळविले.
पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आता राज्यव्यापी दौरा सुरू करत आहेत. कोल्हापुरातून त्याची सुरुवात होत आहे. 2014 साली शिवसेनेला कोल्हापुरात 10 पैकी 6 जागांवर यश मिळाले होते. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत केवळ एका जागेवर यश मिळाले तर एक अपक्ष आमदार शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले होते. प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे एकमेव आमदार निवडून आले. जून 2022 साली शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गट अस्तित्वात आला. त्याना निवडणूक आयोगाना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले. राज्यात सत्तांतर होउन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले.
2024 च्या निवडणुकीत खरी कसोटी होती. जनतेचा पाठिंबा कोणाला याचा निकाल या निवडणुकीत लागणार होता. त्यामध्ये शिंदे शिवसेनेने केलेल्या कामगिरीच्या जोरावर आता हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. नाव आभाराचे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचाराचे रणशिंग यानिमित्ताने फुंकले जाणार आहे. पक्षबांधणीच्या द़ृष्टीने या दौर्याला राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जाणार का? याचा निर्णय पक्ष व नेत्यांच्या पातळीवर होईल. मात्र, सध्या तरी महायुती असो वा महाविकास आघाडी असो ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा उपयोग जागावाटपासाठी केल्या जाणार्या चर्चेवेळी होणार आहे.
कोल्हापुरातही शिंदे शिवसेनेला दहापैकी तीन जागांवर यश मिळाले आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके व राधानगरीतून प्रकाश अबिटकर विजयी झाले आहेत. तर राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. आबिटकर यांना पक्षाने मंत्रिपद दिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 3 आमदार शिंदे शिवसेनेचे आहेत. त्यापाठोपाठ भाजप व जनसुराज्य शक्ती प्रत्येकी 2, शिंदे शिवसेना व भाजप समर्थक अपक्ष प्रत्येकी एक व अजित पवार राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे.