kolhapur | रहिवासी क्षेत्रातील क्रशर तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतर करा 
कोल्हापूर

kolhapur | रहिवासी क्षेत्रातील क्रशर तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतर करा

प्रदूषणाने हैराण नागरिकांची मागणी : संभाजीपूर, धरणगुत्तीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जयसिंगपूर शहरालगत असलेल्या संभाजीपूर, धरणगुत्ती, चिपरी आणि नांदणी या गावांच्या हद्दीत गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेले बेकायदेशीर स्टोन क्रशर व दगड खाणी आता स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत. धूळ, प्रदूषण आणि सततच्या भीषण आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे क्रशर कायमस्वरूपी बंद करून रहिवासी क्षेत्रापासून दूर डोंगर असलेल्या परिसरातील पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याची मागणी जोर धरत आहे.

या गंभीर समस्येकडे दै. ‘पुढारी’ने सलग तीन दिवस वृत्तमालिका प्रसिद्ध करून लक्ष वेधले. दै. ‘पुढारी’च्या या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. तहसीलदार अनिलकुमार हेेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत तब्बल ४५ क्रशर सील केले असून त्यांचा विद्युत पुरवठाही खंडित केला आहे. मात्र, केवळ वीज खंडित करून ही समस्या कायमस्वरूपी सुटणारी नाही, अशी भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दशकांपासून या भागात बेकायदेशीरपणे क्रशर चालवले जात आहेत. क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे विकार व त्वचेचे आजार जडले आहेत. तसेच खाणींमधील उत्खननासाठी केले जाणारे स्फोट आणि दगड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. निष्पाप नागरिकांचा बळी जाण्यापूर्वी या खाणी व क्रशर बंद करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने, निदर्शने व निवेदने दिली आहेत. मात्र, प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत यावर ठोस कारवाई झाली नाही. प्रदूषण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याने नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून या क्रशरधारकांना रहिवासी क्षेत्रापासून लांब, जिथे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात. संभाजीपूर, धरणगुत्ती, चिपरी व नांदणी परिसरातून हे क्रशर पूर्णपणे हटवून नागरिकांना प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क मिळवून द्यावा, अशी तीव्र मागणी आता लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.

किती वेळा ग्रामसभेत ठराव करायचा?

संभाजीपूर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मागणीनुसार गेल्या दोन वर्षांपूर्वी या परिसरातील क्रशर बंद व्हावेत, यासाठी गावसभेत ठराव करून तो जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर केला होता. मात्र तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यापूर्वी संभाजीपूर गावसभेत येथील स्टोन क्रशर बंद करावेत, असा ठराव करून पुन्हा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आला आहे. तरीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे किती वेळा संभाजीपूर ग्रामपंचायतीने ठराव करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी जागेची व्यवस्था हवी

संभाजीपूर परिसरात क्रशरमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याबाबत वारंवार तक्रारींनंतरही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. बेकायदेशीरपणे क्रशर सुरू असताना लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार हे नेहमीच पाठराखण करत असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक लावून पर्यायी जागेचा शोध घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT