कोल्हापूर : शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निषेधार्थ गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. आंदोलनानंतर महापालिका चौकात राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चारचाकीतून निघालेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. मोटारीवर लाथा-बुक्क्या मारल्या, काठीने मारहाणीचा प्रयत्न केला, यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी तातडीने हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना टांगण्याची भाषा केल्यानंतर बुधवारी राजू शेट्टींच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात प्रतिआंदोलन केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर राजू शेट्टी यांच्या प्रतिमेस अभिषेक घातला. यावेळी स्वस्तिक पाटील, अजित पोवार, बाबासोा देवकर, संदीप राजोबा, राजेंद्र गड्ड्यणवार, सुरेश म्हाऊतकर, विक्रम पाटील-भुयेकर, पांडुरंग जरग, सम्राट मोरे, मायकल डिसुझा, रामचंद्र शिंदे, सचिन शिंदे, विशाल चौगुले आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेच्या चौकाकडून त्याला आव्हान देणारा मोर्चा आमदार क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी काढला. पोलिसांनी शिवसैनिकांना महापालिकेजवळ रोखले. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोटारीतून परत जाताना संतापलेल्या आमदार क्षीरसागर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी थेट स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे रस्त्यावर पडले. पोलिसांनी त्यांना सावरले. यानंतर पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, कपिल सरनाईक, सुशील भांदिगिरे, नंदू सुतार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमधून नेले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
आंदोलनाच्या प्रारंभी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर बहुतांशी कार्यकर्ते तेथून निघून गेले होते. यानंतर आमदार क्षीरसागर यांचे कार्यकर्ते त्यांच्या शिवालय कार्यालयाकडून महापालिका इमारतीजवळ जमून घोषणा देत छ. शिवाजी चौकाकडे निघाले. पोलिसांनी सिग्नलजवळ त्यांना रोखले. दोन्हीकडचे आंदोलक समोरासमोर आले असते तर मोठा राडा झाला असता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
एकमेकांना आव्हान देणारी भाषा
आंदोलक शेतकरी संघटना व प्रतिआंदोलक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना आव्हान देणारी भाषा आणि घोषणाबाजी सुरू होती. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देताना आम्ही कोल्हापुरात येऊन आंदोलन केले, असे म्हटले. तर, शिवसेनेने पळाला-पळाला राजू शेट्टी पळाला, अशा घोषणा देत शिवसेनेच्या नादाला लागू नका, असा इशारा दिला.