Kolhapur News | विशाळगडच्या जंगलात राज्यप्राणी शेकरूचे दर्शन file photo
कोल्हापूर

Kolhapur News | विशाळगडच्या जंगलात राज्यप्राणी शेकरूचे दर्शन

विशाळगडच्या घनदाट जंगलात वाघझरा येथे महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला अत्यंत दुर्मिळ शेकरू आढळून आला.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur News |

विशाळगड : सुभाष पाटील

विशाळगडच्या घनदाट जंगलात वाघझरा येथे महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला अत्यंत दुर्मिळ शेकरू (उडती खार) आढळून आला आहे. डॉ. झुंजार माने यांनी या सुंदर प्राण्याचे झाडांवर बागडतानाचे विलोभनीय छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. स्वराज्य प्रतिष्ठान शाहुवाडीच्या वतीने वाघझरा येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान रस्त्यालगतच्या एका झाडावर त्यांना शेकरू दिसला.

शेकरू, ज्याला शास्त्रीय भाषेत रॅटुफा इंडिका आणि इंग्रजीमध्ये इंडियन जायंट स्क्विरल म्हणतात, ही खारींची एक विशेष प्रजाती आहे. महाराष्ट्राच्या डोंगररांगांमध्ये, विशेषतः भीमाशंकरच्या परिसरात या खारींची संख्या अधिक आढळते. विशाळगडच्या समृद्ध वनसंपदेमुळे या भागातही शेकरूचे अस्तित्व दिसून आले आहे. मात्र, या सुंदर प्राण्याचे प्रजनन हळूहळू कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्वराज्य प्रतिष्ठान शाहुवाडीच्या सदस्यांनी महिन्याच्या एका रविवारी वाघझरा पिकनिक पॉइंटची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेदरम्यान त्यांना हा अनोखा अनुभव आला. स्वच्छता करत असताना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणारा एक वेगळाच प्राणी दिसला. प्रथमदर्शनी तो माकडासारखा वाटला, पण बारकाईने पाहिल्यावर तो वेगळा असल्याचे जाणवले. कुतूहल वाढल्याने त्याचे फोटो काढले आणि नंतर तो शेकरू असल्याची खात्री झाली, असे डॉ. झुंजार माने यांनी सांगितले.

१५ वर्षे आयुर्मान... घुमटाकार घरटे...; शेकरूची वैशिष्ट्ये 

शेकरू ही झाडांवर राहणारी मोठी खारूताई आहे. सदाहरित आणि निमसदाहरित जंगलांमध्ये त्यांचे घरटे आढळतात. रानआंबा, आंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर यांसारख्या उंच झाडांवर त्यांना निवास करणे आणि याच झाडांच्या फळांचे अन्न म्हणून सेवन करणे आवडते. ते झाडाच्या काटक्या आणि मऊ पानांचा वापर करून घुमटाकार घरटे बांधतात. शेकरूचे सरासरी आयुर्मान १५ वर्षे असते. मादी तीन वर्षांत आणि नर पाच वर्षांत प्रजननक्षम होतात. मादी एका वेळी साधारणपणे १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू हा निशाचर नसून दिवसा सक्रिय असतो. सूर्योदयाबरोबर ते घरट्याबाहेर पडतात, दिवसभर ठराविक झाडांवर अन्न खातात आणि दुपारी ११ ते ३ या वेळेत विश्रांती घेतात. सूर्यास्तापूर्वी ते पुन्हा आपल्या घरट्यात परततात. विशाळगडच्या जंगलात गवे, बिबटे, हरीण, रानकोंबडी, पिसेरा, पटकुऱ्या, मुंगूस, ससे, माकड, वानर, हरेल, घुबड, भैरी ससाणा, सालींदर, खोकड, धनेश पक्षी यांसारख्या विविध वन्यजीवांचे अस्तित्व तसेच दुर्मिळ वनौषधी वनस्पती आहेत.

वाघझरा हा शाहूवाडीच्या पर्यटनाचा मुकुटमनी आहे. वाघझरा स्वच्छता मोहिमेदरम्यान इतक्या दुर्मिळ प्राण्याचे दर्शन होणे हा एक सुखद अनुभव होता. या भागातील जैवविविधता खूप समृद्ध आहे आणि तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.
- डॉ. झुंझार माने, शाहूवाडी पर्यटन समिती सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT