करवीरमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राहुल पाटील यांना शेकापने पाठिंबा दिला आहे.  Pudhari Photo
कोल्हापूर

करवीरमध्ये शेकापचा काँग्रेसला पाठिंबा; दोन सडोलीकर एकत्र

पुढारी वृत्तसेवा
प्रवीण ढोणे

राशिवडे: पिढ्यान् पिढ्या असणारे राजकीय वैरत्व, संघर्ष बाजूला ठेऊन एकत्र आलेल्या दोन सडोलीकरांच्या एकीची वीण अधिकच घट्ट होणार आहे. करवीरमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राहुल पाटील, यांना पाठिंबा देण्यासाठी शेकापचे युवानेते क्रांतीसिंह पवार, भोगावतीचे संचालक अक्षय पवार यां बंधुच्या पुढाकारातून कोथळी (ता. करवीर) येथे रविवारी (दि. २९) संध्याकाळी मेळावा होत आहे. (Kolhapur Political News)

दोन सडोलीकरांचे राजकीय वैरत्व 

माजी आमदार संपतराव पवार, भोगावतीचे संचालक केरबा भाऊ पाटील, सरदार पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते, नेतेमंडळींच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. मागील अनेक वर्षांपासून दोन सडोलीकरांचे राजकीय वैरत्व, संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. पण हा संघर्ष कमी करण्याच्यादृष्टीने शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांचे चिरंजीव क्रांतीसिंह पवार, पुतणे अक्षय पवार, काँग्रेसचे आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांचे सुपुत्र जि.प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. भोगावतीची निवडणूक एकत्र लढवून जिंकलीही. दुर्देवाने आमदार पी.एन.पाटील यांचे निधन झाल्यानंतर राहुल, राजेश यांना राजकीय पोरकेपणा येऊ द्यायचा नाही. यादॄष्टीने क्रांतीसिंह, अक्षय हे बंधु नेहमीच सोबत राहिले. (Kolhapur Political News)

'साहेबांच्या माघारी, आमची जबाबदारी'

आता मात्र, 'साहेबांच्या माघारी, आमची जबाबदारी' असे म्हणत संपूर्ण शेकापची राजकीय ताकद विधानसभा निवडणुकीसाठी राहुल पाटील यांच्या पाठीशी लावण्यासाठी कोथळीमध्ये शेकापचा मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये शेकाप शक्तिप्रदर्शन करत राहुल पाटील यांना पाठिंबा देणार आहे. त्यामुळे काँग्रेसची राजकीय ताकदही वाढण्यास मदत होणार आहे.

पी. एन यांची उणीव भासू देणार नाही

आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल, राजेश यांनी अशोकराव पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी पी. एन. यांची उणीव तुम्हा भावांना भासू देणार नाही, अशी भावनिकताही व्यक्त केली होती.

दोन सडोलीकर एकत्र, राजकीय ताकद वाढणार

शेकाप व काँग्रेसचे युवानेते एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद वाढणार आहे. त्यामुळे शेकापचे क्रांतीसिंह पवार यांना काँग्रेसकडून राजकीय पद देऊन त्यांचे पुनर्वसन होण्याचीही शक्यता आहे. सध्या अक्षय पवार भोगावतीचे संचालक म्हणून काम करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT