कोल्हापूर : रविवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्‍या पूर्वसंध्‍येला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर आकर्षक पुष्‍प सजावट करण्‍यात आली.  
कोल्हापूर

Sharadiya Navratri Festival | शारदीय नवरात्रौत्सव आजपासून

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घटस्थापनेने चैतन्यदायी सोहळ्यास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवार (दि. ११) पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भाविकांसाठी विविध सोयीसुविधांनी मंदिर परिसर सज्ज झाला आहे. रविवारी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत घटस्थापना होणार असून त्यानंतर विविध धार्मिक विधी आणि परंपरांनुसार नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे.

नवरात्रौत्सवासाठी मंदिर व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, दर्शन मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोपचार सुविधा आणि हिरकणी कक्ष यासह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंद पिवळसर प्रकाशात मंदिराचे दगडी स्थापत्यवैभव अधिक खुलून दिसत आहे. मंदिराच्या बाह्य परिसरातील सजावट आणि रोषणाईमुळे नवरात्रौत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आणि अन्य सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस, देवस्थान समितीचे कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.

घटस्थापनेचा मुहूर्त व नवरंग... आजचा रंग केशरी

घटस्थापनेसाठी रविवारी स. ६.१९ मिनिटांपासून ते स. १०.१२ वाजेपर्यंत, तर अभिजित मुहूर्त स. ११ वाजून ४४ मिनिटांपासून १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. नवरात्रौत्सवामध्ये देवीची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते. त्यानुसार नवरंगांमध्ये रविवारी, दि. ११ रोजी केशरी, भगवा, १२ रोजी पांढ­­­­रा, १३ रोजी लाल, १४ रोजी निळा, १५ रोजी पिवळा, १६ रोजी हिरवा, १७ रोजी राखाडी, १८ रोजी जांभळा, १९ रोजी मोरपंखी, हिरवा असे रंग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT