कोल्हापूर : शरद पवार राष्ट्रवादी, आप आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा शनिवारी केली. आघाडीच्या वतीने महापालिकेच्या सर्व 81 जागा लढविण्याचा निर्धार करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप देसाई आणि वंचित बहुजन आघाडी महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत तिसर्या आघाडीची घोषणा करताना महापालिकेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यात येईल, असे सांगितले.
व्ही. बी. पाटील म्हणाले, इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभेसाठी एकत्र काम केले. नगरपालिका व महापालिका निवडणुकीत मात्र त्यांनी एकाधिकारशाही सुरू केली. ‘आपण म्हणेल तेच पूर्व’ या पद्धतीने राजकारण करण्याचा अनुभव आला. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्याला डावलून आर्थिक बाबींचा, स्वत:चा जवळचा व नातलग यांना तिकीट देण्याचे राजकारण कोल्हापूर भूमीत चालले आहे. यासाठी वेगळी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. महायुती व महाविकास आघाडीचे राजकीय, आर्थिक भ्रष्टाचाराचे राजकारण मोडीत काढण्याचे काम आघाडी करणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकही तिघे एकत्र लढविणार आहोत. आ. सतेज पाटील यांच्याकडे 14 जागांवरुन 11 जागांची मागणी केली होती. याबाबत खा. शाहू महाराज यांना सांगितले होते.
कार्यकर्त्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आप, वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे. 70 लाख असतील तरच उमेदवारी अशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची भूमिका आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी व सत्ताधारी मजोरांना उत्तर देण्यासाठी तिसरी आघाडी काढल्याचे मआपफचे देसाई म्हणाले. अरुण सोनवणे म्हणाले, आप, वंचित इतर बहुजन सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आघाडी केली. कोल्हापूरकर कसं नाही तर कार्यकर्ता पॅटर्न राबविण्यासाठी आघाडी केली आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजीत कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव रामचंद्र कांबळे, बहुजन ऐक्य चळवळीचे मच्छिंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोनच दिवस
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणांगण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्याचे काम अद्याप झालेले नाही. राजकीय पक्षदेखील कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 23 डिसेंबरपासून आजअखेर केवळ 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रविवार, दि.28 डिसेंबर हा सुट्टीचा दिवस आहे. सोमवार, दि.29 व मंगळवार, दि. 30 डिसेंबर असे दोनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत. उमेदवारी अर्जांची विक्री एक हजार 800 हून अधिक झाली असून शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात झुंबड उडणार आहे.