पेठवडगाव : सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून गरिबातील गरीब विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून, ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान व आशेचे नवे किरण निर्माण करणारी आहे, असे प्रतिपादन डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, डीएमआयएचईआरचे प्रो-चॅन्सलर व चीफ अॅडव्हायझर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील समूहाच्या वतीने तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्रविद्यापीठ येथे आयोजित सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डी. वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील व सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत सौ. शांतादेवी डी. पाटील यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी केले. वाढदिवसाचे औचित्य साधून 230 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी आज अधिकच सुसंगत ठरते. 21 वे शतक भारताचे होणार असेल, तर ते लोकसंख्येच्या संख्येमुळे नव्हे, तर शिक्षणातून घडवलेल्या गुणवत्तापूर्ण मानव संसाधनामुळे होईल. यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारी संस्थात्मक रचना उभी राहणे गरजेचे आहे. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःसाठी शिकणे पुरेसे नाही, तर समाजासाठी योगदान देण्याचे ध्येय ठेवावे. स्कॉलरशिपचा उद्देश विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व, मूल्यवृद्धी आणि ज्ञानाचा विकास करणे हा आहे. ही संधी योग्य प्रकारे वापरल्यास तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक बदल घडवता येतील.
संजय डी. पाटील म्हणाले, अवघ्या 238 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला तळसंदे येथील हा शैक्षणिक कॅम्पस आज सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शिक्षणाच्या दर्जावर भर देत सातत्याने पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम व संशोधन या क्षेत्रात भरीव काम सुरू आहे. पुढील पंधरा वर्षांत या कॅम्पसमध्ये 16 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. तसेच जागतिक दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेकडे वाटचाल करत जगातील अग्रगण्य पाचशे विद्यापीठांपैकी एक उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून या संस्थेची ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी वैजयंती संजय पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, भारत पाटील, श्वेता पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे डॉ. पी. बी. साबळे, डॉ. भालबा विभुते, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, मानसिंगराव पाटील, देवराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. मारुती देवकर यांनी केले. कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी आभार मानले.
विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून तळसंदे विद्यापीठाचा पुढील 15 वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी याबाबत थ्रीडी प्रेझेन्टेशनद्वारे माहिती दिली. त्यानुसार पुढील पंधरा वर्षांत विद्यापीठाचा विस्तार आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखा होणार असून, जागतिक दर्जाच्या सुविधा येथे देण्यात येणार आहेत. सुमारे सोळा हजारहून अधिक विद्यार्थी या विद्यापीठात उच्च शिक्षण घेतील, असे त्यांनी सांगितले.