कोल्हापूर : सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने समर्थन दिले आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करणाऱ्या शहरातील लोकप्रतिनिधींनी मोजणीच्या वेळी येऊन दाखवावे, शेतकरी तुम्हाला हिसका दाखवतील, असा इशारा विविध वक्त्यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीसची होळी करण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना हा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
यावेळी विविध वक्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्याचा आणि शेतकरीविरोधी भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार संतोष बांगर, विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली असून आमदार क्षीरसागर यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही केले. याप्रसंगी विजय देवणे, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे, सम्राट मोरे यांच्यासह विविध वक्त्यांची भाषणे झाली.