कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकर्यांनाही हळूहळू महामार्गाची वस्तुस्थिती समजू लागली आहे. विरोधकांचे राजकारण त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच महामार्गाच्या विरोधाची धार कमी होत आहे. येत्या 11 जुलै रोजी मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शक्तिपीठ महामार्गाला समर्थन असणार्या शेतकरी बांधवांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला समर्थन असणार्या शेतकर्यांची शनिवारी रात्री सर्किट हाऊस येथे बैठक झाली. आ. क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारे 2014 पर्यंत सत्तेत होते. त्यांनी कसलाच विकास केला नाही.
शेतकर्यांना महामार्ग पाहिजे आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी महामार्ग झाले, दळणवळण वाढल्याने त्या परिसरातील जमिनींना दर मिळाला. तेथील भागाचा विकास झाला. त्यामुळे 62 गावांमधून जाणार्या या महामार्गाला शेतकर्यांचे समर्थन आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प मोठा असल्याने त्याला राजकीय विरोध होत आहे.
बैठकीला दौलतराव जाधव, राजेंद्र शिंगाडे, नवनाथ पाटील, रोहित बाणदार, सचिन लंबे, अमोल मगदूम, अनिल पाटील, शिवगोंडा पाटील, सुनील निळकंठ, वसंत पिसे, सतीश माणगावे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.