Shaktipith Expressway 
कोल्हापूर

Shaktipeeth Expressway | शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत : आमदार विनय कोरे

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निवेदन

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : शक्तिपीठ महामार्गासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी संपादित करण्याच्या धोरणाला विरोध असल्याची भूमिका जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी आमदार कोरे म्हणाले, “पर्यायी रस्ते उपलब्ध असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन महामार्ग उभारणे योग्य नाही. शेतकऱ्यांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवून तज्ज्ञांशी चर्चा करून पर्यायी मार्ग सुचवू. तसेच या प्रश्नावर कायदेशीर सल्लाही घेतला जाईल. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असून त्यांच्यासोबत आहे.” १९ मे रोजी मुंबई येथे कार्यक्रम असल्याने मेळाव्यास उपस्थित राहता येणार नसले तरी आपल्या प्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना मेळाव्यास पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती हा सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा मंच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. महामार्गासाठी जमीन गेल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होतील. गावागावातील सभांमध्ये शेतकऱ्यांनी कितीही मोबदला दिला तरी जमीन देणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. आमदार म्हणून तुम्ही या आंदोलनाला बळ द्यावे व मेळाव्यास उपस्थित राहावे.” यावेळी नितीन हुजरे, राजेंद्र जाधव, शिवाजी सिद, दीपक जाधव, राहुल जाधव, किरण पाटील, मच्छिंद्र जाधव, पिंटू भोसले, मिलिंद जाधव यांच्यासह हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील नवे-जुने पारगाव, बहिरेवाडी, जाखले, कुशिरे व पोहाळे येथील महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT