shaktipeeth expressway Pudhari
कोल्हापूर

Shaktipeeth highway: शक्तिपीठ महामार्ग आता गोव्याच्या सीमेपर्यंत होणार, खर्चात 14 हजार कोटींची वाढ

Shaktipeeth highway News: दिग्रज ते बांद्यापर्यंत महामार्ग; 856 कि.मी., सातारा जिल्ह्यालाही लाभ; शिरोळ, हातकणंगले, कागल वगळले

पुढारी वृत्तसेवा

Shaktipeeth highway Maharashtra New Route

संतोष बामणे

जयसिंगपूर : नुकतेच महाराष्ट्र शासनाने शक्तिपीठ महामार्ग दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत 856.765 कि.मी.च्या सुधारित महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आखणीमध्ये सुधारणा केली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातूनही हा मार्ग जाणार आहे.

यापूर्वी पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या 802.592 कि.मी. लांबीच्या शक्तिपीठ मार्गास मान्यता देण्यात आली होती. मात्र, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी बागायत शेती जात असल्याने विविध जिल्ह्यातून याला विरोध केला होता. त्यानंतर मंत्री व लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून तुलनात्मकद़ृष्ट्या सर्वाधिक सुयोग्य अशी सुधारित आखणी अंतिम करून प्रस्तावित केली होती.

महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतून, 40 तालुक्यांमधून जात असून, सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तूळजापूर, कोल्हापूर यांचेसह 21 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीतील 18 तासांचा प्रवास साधारणतः 8 तासांवर येणे अपेक्षित आहे.

Shaktipeeth highway | शक्तिपीठ महामार्ग आता गोव्याच्या सीमेपर्यंत होणार

गावनिहाय नकाशाची प्रतीक्षा...

राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाला सुधारितपणे मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात गावनिहाय नकाशा प्रसिद्ध केलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या काही भागातून हा महामार्ग घेण्यात आला आहे. याचा खुलासा मात्र प्रत्यक्षात गावनिहाय यादी प्रसिद्ध झाल्यानंतर समोर येणार आहे.

खर्चात 14 हजार कोटींची वाढ

शक्तिपीठ महामार्गासाठी 3 वर्षांपूर्वी सरकारने 57 हजार कोटी रुपये खर्च येईल असे सांगितले होते. त्यानंतर सर्व आखणी केल्यानंतर या मार्गाला 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र शक्तिपीठची आखणी काही प्रमाणात बदलण्यात आल्याने हा खर्च आता 1 लाख 1 हजार कोटीवर पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT