Shaktipeeth highway | शक्तिपीठ महामार्गाचा आजरा तालुक्याला दणका 
कोल्हापूर

Shaktipeeth highway | शक्तिपीठ महामार्गाचा आजरा तालुक्याला दणका

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा सावंत

आजरा : शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन स्पष्ट झाले असून, भुदरगडमधून येणार्‍या या महामार्गामुळे आजरा तालुक्यातील 600 हेक्टरपेक्षा अधिक बागायती क्षेत्रावर हातोडा बसणार आहे. या महामार्गामुळे 90 शेतकरी कुटुंबे अल्पभूधारक होणार आहेत.

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याची अधिसूचना जाहीर झाली असून, यामध्ये बाधित गावांतील जमिनींचे गट नंबरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. बाधित शेतकर्‍यांची माहिती वेगाने संकलित करण्यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. या माहितीच्या आधारे संयुक्त मोजणी करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचे समजते. मात्र, शक्तिपीठ महामार्गामुळे तालुक्यातील शेतकरी आणि पर्यावरण उद्ध्वस्त होणार असल्याने या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. शेतकर्‍यांचा विरोध डावलून मोजणीचा प्रयत्न झाल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील विविध पाणी प्रकल्पांमध्ये यापूर्वीच जवळपास 1 हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. पुनर्वसनासाठी तालुक्यातीलच 500 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, पाच गावे विस्थापित झाली आहेत. संकेश्वर-बांदा महामार्गासाठीही 16 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली. आता शक्तिपीठ महामार्गासाठी 600 पेक्षा अधिक हेक्टर जमीन जाणार असल्याने, तालुक्यात पिकाऊ जमीन शिल्लक राहणार का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

चहूबाजूंनी तालुक्यावर अन्यायाची भावना

चित्री, आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला या प्रकल्पांसाठी 1 हजार हेक्टर जमीन गेली. विस्थापितांच्या पुनर्वसनासाठीही तालुक्यातीलच जमिनी दिल्या गेल्या. संकेश्वर-बांदा महामार्गासाठी जमीन गेली. याशिवाय गडहिंग्लजचे प्रांत कार्यालय भुदरगडला नेले आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ तीनवरून दोन केले. या सर्व घडामोडींमुळे चहूबाजूंनी तालुक्यावर अन्याय होत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

सर्फनाला प्रकल्पातील गावांवर गंडांतर

गेल्या वर्षापासून सर्फनाला प्रकल्पामुळे शिवारात हिरवाई निर्माण होत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणार्‍या कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोळ या गावांतील शेतीवर आता शक्तीपीठ महामार्गाचे गंडांतर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT