आजरा : परभणी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणार्या शेतकरी स्त्री-पुरुषांवर झालेल्या लाठीचार्ज व बळजबरीच्या कारवाईचा तीव्र निषेध करत आजरा येथे सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शक्तिपीठविरोधी कृती संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी रक्त सांडू; पण कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी कृती संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संपताच शक्तिपीठ महामार्ग जबरदस्तीने रेटण्याचा घाट घातला जात आहे. शेतकर्यांवर सातत्याने अन्याय होत असून शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही. शेतकर्यांच्या हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. हा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, परभणी येथे झालेल्या मोर्चात शेतकरी आंदोलक व महिलांना फरपटत नेण्यात आल्याच्या घटनेचा उपस्थितांनी तीव्र शब्दांत निषेध केला. आजवर महाराष्ट्रात ज्यांनी हुकूमशाही करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनतेने मातीत गाडले आहे. परभणीसारखा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात केला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात कॉ. संजय तर्डेकर, संजय सावंत, कॉ. शांताराम पाटील, दशरथ घुरे, भीमराव माधव, रवींद्र भाटले, प्रकाश मोरूसकर, काशीनाथ मोरे, बाळू जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.