Shaktipeeths | भाविकांच्या गर्दीने फुलणार साडेतीन शक्तिपीठे  File Photo
कोल्हापूर

Maharashtra Sade Tin Shaktipeeth: नवरात्रीत भाविकांच्या गर्दीने फुलणार महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, असे असेल व्यवस्थापन

sade teen shakti peeth in maharashtra: महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी नवरात्रौत्सवात लाखो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येतात.

पुढारी वृत्तसेवा

Navratri 2025 Sadetin Shaktipeeth Kolhapur Tuljapur Mahur Saptashrungi

कोल्हापूर; टीम पुढारी : नवरात्रौत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसांचे महत्त्वाचे व्रत आहे. देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते. भारतात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी नवरात्रौत्सवात लाखो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येतात. भाविकांची गर्दी पाहता संस्थानांकडून पुरेशा सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचा घेतलेला आढावा...

श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात 25 लाखांवर भाविक दर्शन घेण्याचा अंदाज

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सोमवारी (दि. 22) पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे.

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला फुलांची आकर्षक सजावट, मंदिराला केलेली नयनमनोहरी विद्युतरोषणाई, मार्गावर उभारलेल्या स्वागत कमानी आणि भाविकांच्या गर्दीने सारा परिसर फुलून गेला होता.

असे असेल व्यवस्थापन

दर्शनरांगेचे काम पूर्ण झाले असून गर्दीवर नियंत्रणासाठी यावर्षी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

5 डीएफएमडी, 15 वॉकी टॉकी, 3 एक्स रे बँगेज स्कॅनर, 1 ड्रोन कॅमेरा वापरला जाणार आहे.

11 ठिकाणी एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत.

तुळजापूर मंदिर परिसरात एआयद्वारे गर्दीचे नियंत्रण

धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ती सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी यंदा पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा आधार घेतला आहे. दर्शन व्यवस्था अधिक सुटसुटीत व्हावी यासाठी सहा एआय-कॅमेरे मंदिर परिसरात बसवण्यात आले आहेत.

सप्तशृंग गडावर 6 लाख भाविक येण्याची शक्यता

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर सोमवार (दि. 22) पासून शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या उत्सवासाठी संपूर्ण गड परिसर सज्ज झाला आहे. या काळात सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक भाविक गडावर देवी दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

माहूरगड : खासगी वाहनांना बंदी; 120 एसटी बसेसची व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर ः साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथे नवरात्रीच्या काळात भाविकांसाठी नियंत्रण कक्ष, वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छता, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी सांगितले. माहूरगडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली असून, 120 एसटी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे मदत केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT