सुभाष पाटील
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी होत असलेल्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, एकूण १ लाख ५९ हजार १२३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने चार स्थिर पथके आणि चार भरारी पथकांचा सक्त पहारा राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या ४ जागेसाठी १३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ८ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यातील २०९ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार असून, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी कार्यरत राहतील. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १३८० जणांचा मोठा स्टाफ तैनात करण्यात आला आहे.
साहित्य वाटप आणि नियोजन
६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडावूनमधून मतदान पथकांना साहित्याचे वाटप करण्यात येईल. यासाठी २० टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, पुरेसा कर्मचारी वर्ग तिथे नियुक्त आहे. नियुक्त केलेल्या विशेष वाहनांद्वारे ही पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना होतील. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे.
प्रशासनाचे आवाहन
निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सीमा सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना घराबाहेर पडून शांततेत आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. "मतदान हा आपला हक्क असून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदवावा," असे शिंगण यांनी स्पष्ट केले.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच वाहतूक आराखडा तयार करणे, केंद्रावरील आवश्यक सुविधांची उपलब्धता पाहणे, निवडणुकीत बाधा उत्पन्न करणारे, अशांतता/दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करणे, मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व केंद्रांवर पुरेसा कर्मचारी वृंद, सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्य आदी उपलब्धता असल्याची खात्री करणे, मतदान कर्मचारी यांच्या मतदान विषयक सर्व शंकांचे निरसन करणे, अभिरुप मतदानादिवशी अडचणी दूर करणे, मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्र बंद पडल्यास त्याजागी त्वरित नवीन मतदान यंत्र बदलून देणे, मतदान केंद्रावर मतदार मदत कक्ष कार्यरत ठेवणे आदी कामकाज स्वरूपात दक्ष राहण्याचे तसेच कामकाजात निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत, असेही वर्षा शिंगण यांनी सांगितले.
गट एकूण मतदार महिला पुरुष
शित्तूर तर्फ वारुण ३९,५३४ १९,१६७ २०, ३६७
सरूड ३८,७८६ १९,०३५ १९, ७५१
बांबवडे ४१,७४८ २०,२४० २१, ५०८
आंबर्डे ३९,०५५ १८,७८५ २०, २७०
एकूण १,५९,१२३ ७७,२२७ ८१, ८९६