Shahuwadi Vidyamandir Parkhandale Quiz Winners
सुभाष पाटील
विशाळगड : जिद्द, चिकाटी आणि अष्टपैलू बुद्धिमत्तेच्या जोरावर शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर परखंदळे शाळेने कोल्हापूर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णमयी यश संपादन केले आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे ही चुरशीची स्पर्धा पार पडली. या यशाने केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचे नाव जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावर सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.
यशाचा प्रवास: तालुक्याकडून जिल्ह्याकडे
तालुका स्तरावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवल्यानंतर, विद्यामंदिर परखंदळे शाळेची निवड जिल्हास्तरीय फेरीसाठी झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या संघाने विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
प्रथमेश जाधव
अंकिता जाधव
समृद्धी खोत
या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे दर्शन घडवत सर्वांची मने जिंकली. विजयाची घोषणा होताच शाळेत पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षक सचिन जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी घेतलेल्या विशेष तयारीमुळेच विद्यार्थी या स्तरावर चमकू शकले. मुख्याध्यापक विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले, तर शिक्षक कृष्णा शिंदे, भानुदास सुतार व मल्लिकार्जुन स्वामी यांचेही याकामी विशेष सहकार्य लाभले.
ग्रामीण भागातील एका छोट्याशा शाळेने जिल्हा स्तरावर मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल गावकरी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाने शाहूवाडी तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ग्रामीण भागातील मुलांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण प्रतिभा कोठेही कमी पडत नाही, हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे.- डॉ. विश्वास सुतार, गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी