कोल्हापूर : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) खून प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे होऊन सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन बुधवारी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना दिले. यामध्ये दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले.
उसने घेतलेले ८ तोळे दागिने आणि ३ लाखांची रोकड परत मागितल्याने न्यारे यांचा खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटंबीयांनी केला. या प्रकरणी प्रकाश पाटील, त्याची पत्नी मंगल पाटील, मुलगा शिवाजी पाटील आणि या प्रकरणात मदत करणारा प्रकाश पाटील याचा भाचा संदेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात साहिल न्यारे, जनार्दन न्यारे, संग्राम पाटील, बाळासो पाटील, तानाजी गुजर, यशवंत जाईंगडे, बाबाजी पाटील, लक्ष्मण पाटील, महादेव पाटील आदींचा समावेश होता.