सुभाष पाटील
विशाळगड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाहुवाडी तालुक्यातील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. शाहूवाडी शिक्षण विभागाने तब्बल ८५,०२५ पुस्तकांची मागणी नोंदवली असून, गटशिक्षणाधिकारी डॉ विश्वास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराधिकारी अनिल कुलकर्णी व विषय तज्ञ भगवान पुजारी यांनी पाठ्यपुस्तक वाटपाचे अचूक नियोजन केले आहे..
शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५९ आणि खाजगी अनुदानित ४८ अशा एकूण ३०७ शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये १३ हजार ७१२ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी शासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते.
प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात बालभारतीच्या पोर्टलवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८५,०२५ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या गतिमान आणि चोख नियोजनामुळे यंदा शाहूवाडी तालुक्यात पहिल्याच दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव' मोठ्या थाटात आणि पुस्तक वाटपाच्या आनंदाने साजरा होणार, हे मात्र नक्की!
इयत्ता एकूण विद्यार्थी मागणी पुस्तके
विद्यार्थी - पुस्तके
१ ली १,२९१ - ३,८७३
२ री १,४११ - ४,२३३
३ री १,४९३ - ७,४६५
४ थी १,६९८- ८,४९०
५ वी १,९२६- १३,४८२
६ वी २,०७७ - २०,७७०
७ वी १,८८७ - १३,२०९
८ वी १,९२९ - १३,५०३
एकूण १३,७१२ - ८५,०२५
पुस्तकांअभावी एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र, शाळा आणि माध्यमनिहाय पुस्तकांचे वर्गीकरण करून ती वेळेत पोहोचवली जातील. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करणे हाच आमचा मानस आहे.— डॉ. विश्वास सुतार (गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी)