अतिवृष्टीमुळे वीज वितरणला लाखोंचे नुकसान झाले आहे Pudhari File Photo
कोल्हापूर

Shahuwadi News : 'शाहूवाडी'त अतिवृष्टी व महापुरामुळे वीज वितरणला २५ लाखांचा फटका

४९ विजेचे खांब, १०० पेक्षा जास्त विद्युत तारा तुटल्या, दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची कसरत

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील   

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी, वादळी वारा व महापुरात वीज वितरणचे ४९ विद्युत पोल वाकून, उन्मळून पडले आहेत. १०० हून अधिक विद्युत तारा तुटल्या तर ६० इन्सुलेटर खराब झालेत. त्याचबरोबर इतरही नुकसान झाले. त्यामुळे या आपत्तीत सुमारे २५ लाखांचा आर्थिक फटका महावितरणला बसल्याची माहिती शाहूवाडी उपकार्यकारी अभियंता पी. व्ही. कुंभारे यांनी दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करत कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणूनच 'जनतेला प्रकाशमय करणारे प्रकाशदूत' जनमाणसात आदराचे स्थान ठरले. (Shahuwadi News)

शाहूवाडी तालुका दुर्गम, डोंगराळ असून १४१ गावे व २२५ वाड्या-वस्त्यांनी व्यापला आहे. मुसळधार पाऊस, साप, विंचवाची भिती, डास, कीटकांचा त्रास अशा स्थितीत विजेविना अंधारात रात्र काढण्याची कल्पनाही सहन होत नाही. पण नागरिकांवर अशी वेळ येऊ नये म्हणून मागील १५ दिवसांपासून संततधार पावसात महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जीवाची बाजी लावून झटत आहेत. अतिवृष्टीने घरे, झाडे, शेतीसह महावितरणच्या वीज वाहिन्या, विजेचे पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री-अपरात्री चिखलातून, पुराच्या पाण्यातून, रानावनातून, सुविधांचा अभाव असताना नैसर्गिक संकटाशी सामना करत जीवाची बाजी लावत विद्युत पुरवठा सुरू केला. 

कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे अंधारलेल्या बराच भाग प्रकाशमय झाला आहे. जनतेला प्रकाशमय करणारे प्रकाशदूत सध्या प्रसिद्धीपासून अंधारात आहेत. विद्युत पोल हे शेतामध्ये असल्याने तेथे नवीन खांबांची वाहतूक करणे, विद्युत वाहक तारा ओढणे ही मोठी कसरत होती तरीसुद्धा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी व्ही कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी आणि तांत्रिक टीमच्या मदतीने रात्रंदिवस कसरत करत विद्युत पुरवठा कायम करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नैसर्गिक अडचणींचा सामना करत दुरुस्ती

सर्वत्र दलदल, महापूर, सोसाट्याचा वादळी वारा, अतिवृष्टी निर्माण झाली आहे. अशावेळी खांब उभे करणे, तारा ओढणे. त्यातच शेतामध्ये असलेली उभी पिके तर काही ठिकाणी ओढे, नाले अशा ठिकाणी विजेचे खांब उभे करण्याबरोबरच नवीन तारा ओढताना कर्मचारी मेटाकुटीला येत आहेत.

जिगरबाज कर्मचारी

अतिवृष्टी व महापुरात आनंदा चव्हाण, राम घेवदे, विकास सावंत, सूरज कांबळे, गणपती पाटील, विक्रम सासणे, तानाजी वनागडे आदी महावितरणच्या जिगरबाज व धाडसी कर्मचाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कर्तव्य बजावत ग्राहकांना सेवा दिली.

सोसाट्याचा वादळी वारा, अतिवृष्टीमुळे तालुक्यात विद्युत खांब कोसळणे, खांब वाकणे, विद्युत तारा तुटणे आदी प्रकारामुळे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत असून काही तांत्रिक अडथळे येत आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तरी ग्राहक, नागरिकांनी सहकार्य करावे.      
- पी व्ही कुंभारे, उपकार्यकारी अभियंता शाहूवाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT