शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी राज्य सरकारने १५ कोटी रुपयांच्या निधीस तात्पुरती मान्यता दिली आहे. या यशामागे महाराष्ट्र शासनाचे माजी अर्थसचिव सुरेश गायकवाड यांचे अथक प्रयत्न फलदायी ठरले आहेत.
शाहूवाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या विशेष बैठकीत सुरेश गायकवाड यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सांस्कृतिक भवनासाठी सुमारे एक एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी स्थानिक जनतेच्या १०% सहभागातून एक कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बौद्ध सेवा संघाचे गिरीश कांबळे यांनी सांगितले की, शाहूवाडी तालुक्यातील १४० गावांमधील नागरिकांनी कमीत कमी एक लाख रुपयांचा सहभाग द्यावा. “हा लोकसहभाग केवळ निधी संकलन नाही, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित श्रद्धांजली असेल,” असे त्यांनी म्हटले.
प्रा. बापूसाहेब कांबळे यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, पुणे विभाग व मंत्रालय पातळीवर सर्व आवश्यक पाठपुरावा पूर्ण झाला आहे. या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.