Crops drying due to lack of rain Shahuwadi File Photo
कोल्हापूर

Kolhapur News: शाहूवाडीत पावसाची दडी; माळरानावरील पिके करपू लागली, शेतकरी हवालदिल

शाहुवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेती पिकांवर मोठे संकट ओढावले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur News:

बांबवडे: शाहुवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेती पिकांवर मोठे संकट ओढावले आहे. सुरुवातीला झालेल्या उत्तम पावसामुळे यंदाचा शेती हंगाम अत्यंत चांगला राहिला होता आणि पिकेही जोमात आली होती. मात्र, आता ऐन गरजेच्या वेळीच पावसाने दडी मारल्यामुळे माळरानावरील पिके पाण्याच्या अभावाने करपू लागली आहेत. येत्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास हाती आलेले पीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.

शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. विशेषतः माळरानावरील जमिनीची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पावसाचा ताण बसताच पिकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. तालुक्यात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते. पाण्याचा तुटवडा भासल्याने भात पूर्ण भरण्याच्या आतच पिवळी पडू लागली आहेत.

कोरडवाहू भागातील नाचणी आणि वरीची रोपे उन्हाच्या तीव्रतेमुळे सुकत चालली आहेत. ​भुईमूग व सोयाबीन शेंगा धरण्याच्या व फुलोऱ्याच्या संवेदनशील टप्प्यावर पाऊस लांबल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तसाच परिणाम, ​वरई व मूग/उडीद कडधान्य पिकांना उन्हाचा तडाखा बसल्याने पानांची गळती सुरू झाली आहे.

माळरानावरील पिके हातातून जाण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे किंवा जे नदीकाठच्या भागात आहेत, त्यांनी आपली पिके वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. नदीकाठावरील शेतातून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी आता तातडीने विद्युत पंप जोडण्याच्या आणि दुरुस्तीच्या कामात व्यस्त झाले आहेत. विहिरी, कूपनलिका आणि नद्यांमधून ठिबकद्वारे पिकांना पाणी देऊन ते वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

"आतापर्यंतचा हंगाम अतिशय चांगला गेला होता, पिकांची वाढ उत्तम झाली होती. परंतु, ऐनवेळी पावसाने ओढ दिल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. जर पुढील ४८ तासांत पाऊस पडला नाही, तर शेतात उभा असलेला सगळा शिवार वाळून जाईल आणि आमचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल," अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ​सध्या शाहूवाडी तालुक्यातील सर्वच भागांत आकाश निरभ्र राहत असून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, यासाठी बळीराजा आता चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT