कोल्हापूर

शाहूवाडी : ‘कासारी’ धरणात २८ टक्के पाणीसाठा, गतवर्षीपेक्षा ८ टक्के पाणीसाठा कमी 

स्वालिया न. शिकलगार

विशाळगड : सुभाष पाटील – शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात सोमवार अखेर (दि.८) २८.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तो गतवर्षीच्या तुलनेने आठ टक्का कमी आहे. उर्वरित पाच लघुपाटबंधारे प्रकल्पात सरासरी ४० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्वंच लघू धरणांतील पाणीसाठा मुबलक असल्याने यंदा सिंचन व पिण्यासाठी जूनअखेर पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

कासारी परिसरातील पाणी प्रश्न सोडवून परिसरातील जमीन ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने कासारी नदीवर बाजीप्रभू जलाशयाच्या कामाला दिनांक २४ एप्रिल १९७७ मध्ये सुरुवात झाली. त्यासाठी ३३.२८ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण ७८.५६ दलघमी पाणीसाठा व्हावा अशा पद्धतीने आखणी करण्यात आली. गेळवडे, गजापूर या गावांचे पुनर्वसन झाल्याने ३८०.३० मिटर लांबीचा हा प्रकल्प साकारण्यात आला. शाहूवाडीतील २० व पन्हाळ्यातील ४१ गावातील सुमारे ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे हे प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी याच दिवशी गेळवडे धरणात ३६.५० टक्के पाणीसाठा होता. तो आता २८.२३ टक्के आहे.

इतर लघू धरणांतील पाणीसाठा असा : पडसाळी २६.६८ टक्के, पोंबरे ४१.२३ टक्के, नांदारी १८.४४ टक्के,  केसरकरवाडी २०.५५ टक्के, कुंभवडे ३२.४४ असा ८ मेअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील विविध धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे. जून अखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही; अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

उन्हाची तीव्रता, पाण्याचा वाढता वापरामुळे पाणी टंचाईची भविष्यातील शक्यता गृहीत धरून पाटबंधारे विभागाने कासारी नदीकाठावरील शेतीसाठी १८ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान पाणी उपसाबंदी केली होती. त्यामुळे या कालावधीत शेतीसाठी उपसा करता आला नाही.

कासारी धरणात आजमितीला २८ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा- रोहित बांदिवडेकर ( कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, कोल्हापूर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT