कोल्हापूर : कौटुंबिक वादातून दाखल गुन्ह्यात तपास आणि जामिनासाठी मदत करतो, असे सांगून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी ‘शाहूपुरी’त कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव (वय ३२, रा. कळंबा, ता. करवीर, मूळ हातनोली, ता. तासगाव, सांगली) हिच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा जाधव हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.मूळची शाहूवाडी तालुक्यातील असलेल्या मुंबई पोलिस दलात कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक व बांधकाम व्यावसायिक पती यांच्यात कौटुंबिक मतभेद होते. त्यातून पतीने पोलिस अधिकारी पत्नीवर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. पतीविरुद्ध गुन्हा दाखल होताच शाहूपुरी पोलिसांनी त्यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हिच्याकडे गुन्ह्याचा तपास होता. तपासात आणि जामिनासाठी मदत करतो, असे सांगून जाधव हिने तक्रारदाराच्या वडिलांकडून २५ हजार रुपये घेतलेे. उर्वरित २५ हजारांसाठी तगादा सुरू होता. तक्रारदाराने ‘एसीबी’ कडे जाधव हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपनिरीक्षक जाधव हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले. दरम्यान, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव हिचे कळंबा येथील घर सील करण्यात आले आहे.