Sugar Factory Pudhari File Photo
कोल्हापूर

Shahu Sugar Factory | ‘शाहू’ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

पुढारी वृत्तसेवा

कागल : राष्ट्रीय साखर महासंघ, नवी दिल्ली यांच्यातर्फे गळीत हंगाम २०२४-२५ साठी उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सहाव्यांदा जाहीर झाला आहे. कारखान्याला मिळालेला हा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मिळून ७३ वा पुरस्कार आहे.

राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पुरस्काराची घोषणा केली असून, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. दि. २२ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘शाहू’ला आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील २८ आणि राज्य पातळीवरील ४५ असे एकूण ७३ पुरस्कार मिळाले आहेत. २०२४-२५ हा गळीत हंगाम सर्वच साखर कारखान्यांसाठी अतिशय खडतर व कठीण गेला होता. अशा परिस्थितीतही शाहूने नियोजनबद्धपणे सर्वच पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली होती. याची दखल घेत या पुरस्काराने कारखान्याचा सन्मान केला.

कारखाना चालविताना दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, त्यास सभासद शेतकऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणे दिलेली साथ आणि व्यवस्थापनाच्या नियोजनाला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कष्टांची मिळालेली जोड, याचाच हा परिपाक आहे. त्यांच्या पश्चातही पुरस्कारांमध्ये राखलेले सातत्य हे समरजित घाटगे व संचालक मंडळाच्या कुशल नियोजनाखाली सुरू असलेल्या ‘शाहू’च्या सभासद-शेतकरी अभिमुख कामकाजाचा सन्मान आहे.
सुहासिनीदेवी घाटगे (अध्यक्षा, शाहू साखर कारखाना)
सर्वसामान्य सभासद शेतकरी, कष्टकरी कामगार आणि समाजातील सर्वच घटकांचा विकास केंद्रबिंदू ठेवून दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याची स्थापना केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालवून त्यांनी त्याला नावारूपास आणले. आणि देशातील अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ‘शाहू’चा नावलौकिक निर्माण केला. त्यांच्या कारकिर्दीत कारखान्यास ५५ विविध पुरस्कार मिळाले. त्यांच्या पश्चातही ही गौरवाची परंपरा कायम ठेवत आणखी १८ पुरस्कारांची भर पडली.
समरजित घाटगे, अध्यक्ष, शाहू उद्योग समूह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT