कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाने पाठिंबा जाहीर केला. संस्थेच्या शिवाजी पेठ येथील शैक्षणिक संकुलात आयोजित विविध शैक्षणिक शाखांतील शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधर यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर सई खराडे म्हणाल्या, ‘पुढारी’ परिवाराशी खराडे कुटुंबीयांचा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव या घरच्या उमेदवार आहेत. त्यांना विजयी करणे हे आमचे कर्तव्य आहे. ‘नको फक्त आश्वासन हवे आहे काम, हाच विचार घेऊन आलेत आपले दोन नाव, एक म्हणजे गावडे सरांची शिक्षणाची शान. दुसरी म्हणजे जाधवताईंची पदवीधरांची मान,’ या ओळी खराडे यांनी सादर केल्या.
कस्तुरी खराडे यांनी संस्थेतर्फे कौस्तुभ गावडे आणि डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा जाहीर करण्यामागील भूमिका प्रास्ताविकामध्ये स्पष्ट केली. यावेळी डॉ. एस. बी. गावडे, कल्पना निंबाळकर, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, ‘पुढारी’चे प्रतिनिधी सुनील सकटे यांची भाषणे झाली.कार्यक्रमास शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अजित खराडे, ॲड. मुद्रा खराडे, शिवतेज खराडे, गायत्री राऊत, अभय निंबाळकर आणि प्राचार्य डॉ. ए. एस. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आर. एस. अवघडे यांनी केले.