कोल्हापूर

दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार : शाहू महाराज यांची भूमिका

दिनेश चोरगे

कोल्हापूर; प्रतिनिधी : हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी राजर्षी शाहू महाराज यांचा कायदेशीर वारसदार आहे, अशी भूमिका कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी रविवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली. त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे. या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी 1956 च्या हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले.

मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब ऊर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पुत्र आहे, म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापरपणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे. दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच; पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षांत राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले. त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे. साठ वर्षांत जनतेकडून मिळणारे अखंड प्रेम, लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले, अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरू आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे. शाहूंचे समतावादी विचार समाजात रुजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच; शिवाय वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT