कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपले काम करायचे ठरवले असेल, असे विधान खासदार शाहू महाराजांनी गुरुवारी केले. नर्सरी बागेत राजघराण्याच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खा. शाहू महाराज म्हणाले, आज शिवजयंती जगभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. जनतेसाठी काय करावं लागेल हे त्यातून लक्षात येऊ शकते. शिवरायांनी जो आदर्श घालून दिला आहे, त्यानुसारच आपल्याला चालायचं आहे, असे सांगत ते म्हणाले, त्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो. मात्र त्यांचे जास्तीत जास्त विचार घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. राज्यात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून सुरू झालेल्या वादाबाबत बोलताना शाहू महाराज म्हणाले, आपण बिटिशांच्या विरुद्ध लढत असताना बिटिशांना कोणी कोणी मदत केली, हे पाहण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम करायचे ठरवले असेल.