कोल्हापूर : जिल्हा प्रशासन व राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाही दसरा महोत्सवाचा प्रारंभ सोमवारी (दि. 22) होणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे यांच्या विशेष उपस्थितीत प्रारंभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता दसरा महोत्सव उद्घाटन समारंभ झाल्यानंतर ‘गाथा शिवशंभूची’ या ऐतिहासिक महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी शहरात दाखल होणार्या सर्व भाविक-पर्यटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे.