इचलकरंजी : शहापूर येथील अवधुतनगर परिसरात गॅस गळती झाल्याने घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत रामनवमी बिरबल यादव (वय 66, मूळ रा. बिहार) हे गंभीर जखमी झाले. या स्फोटामुळे घर आणि प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती. स्फोटाच्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
अवधूतनगर येथे गोपाळ रामा कोष्टी यांच्या घरी एका खोलीत रामनवमी यादव वास्तव्यास होते. ते एकटेच राहात होते. सकाळी चहा करण्यासाठी गॅस शेगडी सुरू करत असताना गॅस गळती होऊन स्फोट झाला. मोठा आवाज झाल्यामुळे नागरिकांनी तातडीने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथकाने धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत यादव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेत प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे तर भिंतींनाही तडे गेले आहेत. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.