कोल्हापूर ः रंकाळ्याच्या सौंदर्याला रविवारी वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले. पर्यटकांच्या गर्दीमुळे रंकाळा टॉवर ते वाशी नाका रस्त्यावर वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Kolhapur traffic jam | कोल्हापुरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

रंकाळा, देवकर पाणंद आणि कळंबा परिसरात वाहनांच्या रांगा; पर्यटकांसह भाविकांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात रविवारी सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सुट्टीचा दिवस आणि लग्नाचे मुहूर्त यामुळे रस्त्यावर उतरलेल्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे दोन मिनिटांच्या अंतरासाठी वाहनधारकांना अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागले. या कोंडीमुळे कोल्हापूरकरांसह शहरात आलेले पर्यटक आणि भाविक अक्षरशः हैराण झाले होते.

रंकाळा परिसर झाला ब्लॉक

सायंकाळी सातच्या सुमारास रंकाळा परिसरात वाहतुकीचा मोठा पेच निर्माण झाला. जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर हा मार्ग पूर्णतः ब्लॉक झाला होता. या रांगेचा परिणाम पाण्याचा खजिना, ताराबाई रोड, रंकाळा बसस्थानक आणि फुलेवाडी या उपमार्गांवरही झाला. वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत असल्याचे चित्र होते.

चौकाचौकांत कोंडीचे सावट

देवकर पाणंद चौक परिसरात चारही बाजूंनी येणार्‍या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. तसेच कळंब्यातील साई मंदिर चौकात तासाभराहून अधिक काळ कोंडी कायम होती. शहराच्या मध्यवस्तीत व्हिनस कॉर्नर ते मार्केट यार्डपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उड्डाणपूल, टेंबलाई चौक आणि बिंदू चौक परिसरातही हीच भीषण स्थिती होती.

नवदाम्पत्यांनाही मनस्ताप

रविवारी लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक नवदाम्पत्य देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. मात्र, आनंदाच्या क्षणी त्यांनाही या ट्रॅफिक जॅमचा मोठा फटका बसला. महाद्वार रोड आणि परिसरात लग्नाच्या वर्‍हाड्यांत गाड्या अडकून पडल्याने अनेक विवाह सोहळ्यांच्या नियोजनावरही परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत शहराच्या मुख्य मार्गांवर लाल दिव्यांच्या रांगा आणि हॉर्नचा आवाज घुमत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT