कडगाव : भुदरगड तालुक्यातील धबधब्यांकडे जाणार्या रस्त्यांची सुधारणा झाल्यानंतर पर्यटन क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध होऊन हे धबधबे विकसित करण्यात आले असून, आता या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
या धबधब्यांमध्ये खेडगे, नितवडे, दोनवडे येथील धबधब्यांचा समावेश असून, हे सर्व धबधबे गारगोटीपासून अवघ्या 18 कि. मी. च्या परिसरात आहेत. सध्या येथे महाकाय, भीमकाय, डुक्करकडा, जांभूळकडा, मंडीपकडा आणि सवतकडा अशा सात धबधब्यांची रांग पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे सात धबधब्यांची सप्तरंग उधळण पर्यटकांसाठी खुली झाली आहे. तालुक्यातील भुदरगड व रांगणा किल्ला, मौनी सागर जलाशय, मौनी महाराज मठ, सिद्धाची गुहा, पाटगाव व आकुर्डे, फये, पाली ही प्रेक्षणीय स्थळे आधीच प्रसिद्ध होती. आता या धबधब्यांची भर पडल्याने पर्यटनाचा चेहरामोहराच बदलला आहे. मात्र, दोन मोठ्या धबधब्यांच्या उंचीवरून पाणी पडते त्या ठिकाणी उन्हाळ्यात डबर, खडी, सिमेंट वाळू टाकून खड्डा भरून कोणीही खोल पाण्यात बुडू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी यानव्यालूक मधील धबधब्यांचे मोठ्या थाटामतात उद्घाटन होणार होते; पण काही कारणाने ते झाले नाही.