कोल्हापूर : करवीर हायकर्सच्या मोहिमेत एव्हरेस्ट सर केल्यानंतर झेंडा फडकविण्यात आला. 
कोल्हापूर

Everest Base Camp | एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सातजणांनी फडकवला तिरंगा

करवीर हायकर्सच्या वतीने संविधान उद्देशिका प्रदर्शनाने मोहीम केली यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर हायकर्सच्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून 5364 मीटर उंचीवर पोहोचत ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम शनिवारी यशस्वी केली. या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचाही समावेश होता.

वयाच्या 21 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणार्‍या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणार्‍या ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणार्‍या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.

एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत 15 मे रोजी राहुल गायकवाड, प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी. के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, मुरुमचे आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, नुपूर आणि अक्षय मठकर दाखल झाले.काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणार्‍या लुकला विमानतळ येथून छोट्या विमान प्रवासानंतर प्रत्यक्षात ‘इबीसी’कडे वाटचालीला सुरुवात झाली. शनिवारी (दि. 23) राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या यशस्वी मोहिमेची सांगता झाली. नेपाळमधील ‘पीक 15 अ‍ॅडव्हेंचर’चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली आहे.

प्रतिकूल वातावरण, खडतर मार्गावर मात करत शिखर पार

रात्री उणे 15 अंश सेल्सिअस तर दिवसा 4 ते 6 अंश सेल्सिअस तपमान, लोबूचे ते ‘इबीसी’ अतिशय जीवघेणा प्रवास ठरला. प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. वाटेत येणार्‍या अशा आव्हानांना सक्षमपणाने सामोरे जात लुकला, फाकडींग, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरकक्षेप ते एव्हरेस्ट बेस कॅम्प असा हा ट्रेक पूर्ण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT