यड्राव : ‘मोका’ कारवाईसह 11 गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत जयसिंगपूरच्या सराफाकडून 30 ग्रॅम सोन्याच्या बदल्यात 125 ग्रॅम सोने वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहापूर पोलिस ठाण्याकडील निरीक्षक सचिन सूर्यवंशी, तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, कॉन्स्टेबल रोहित डावाळे, सतीश कुंभार यासह कर्मचार्यावर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी सोनार अरविंद जगन्नाथ कांडेसर (रा. जयसिंगपूर) यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मीटूमी फायनान्स कंपनीचा मॅनेजर वासिम आवटी हा ओळखीचा असल्याने कांडेसर यांनी त्याच्याकडून 30 ग्रॅम सोने 1 लाख 60 हजार रुपयांना खरेदी केले होते; परंतु पोलिसांनी 220 ग्रॅम सोन्याची मागणी केली. त्यास नकार दिल्यानंतर 11 गुन्ह्यांत आरोपी करून दुकान कायमचे बंद करू तसेच ‘मोका’खाली कारवाई करण्याची धमकी दिली. यामुळे भयभीत होऊन कांडेसर यांनी पोलिसांनी दिलेल्या त्रासामुळे व धमकीमुळे 125 ग्रॅम 24 कॅरेटची लगड असलेले सोने 9 डिसेंबर रोजी तपास अधिकारी दरेकर व डावाळे यांच्याकडे दिले. यावेळी दरेकर यांनी हे सोने वडगाव पोलिस ठाण्याकडे गुन्ह्यात असल्याने तिकडे वर्ग करतो अशी भाषा बोलली होती. हा विषय संपला असल्याने कांडेसर निवांत झाले. मात्र या चारेीतील संशयीतांचा ताबा वडगाव पोलिसांनी घेतल्यानंतर पुन्हा संशयीतांनी कांडेसर यांच्याकडे सोने दिल्याची कबुली दिली. त्यानुसार वडगाव पोलिसांनी कांडेसर यांना घेवून शहापूर पोलिस ठाण्यात आले.
यावेळी शहापूर पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देवून परिचय नसल्याचे दाखवू लागले. तसेच वडगाव गुन्ह्यातील कोणतेही सोने आम्ही जप्त केले नाही असे म्हणत मारहाणीची भाषा केली. यावेळी दोन्ही पोलिस ठाण्याकडील तपास पथकामध्ये वादावादीचा प्रसंग घडला. एका गुन्ह्यात 125 ग्रॅम दिलेले सोने वडगाव पोलिसांकडे जमा न करता सोन्याचा स्वत:साठी वापर केला आहे. या प्रकरणातील संबंधीत अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करावी व माझ्याकडून जप्त केलेले 125 ग्रॅम सोने वडगाव पोलिसांकडे द्यावे, तोपर्यंत माझ्यावर कोणतीही कारवाई करु नये असे निवेदनात म्हटले आहे.