कोल्हापूर : मला वाटलं मंत्री हसन मुश्रीफ मला गोकुळ निवडणुकीच्या शुभेच्छा देतील; पण त्यांनी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या शुभेच्छा दिल्या, अशी कोपरखळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावली. दक्षिण भारत जैन सभेच्या महासैनिक दरबार हॉल येथील अधिवेशनात दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय टोलेबाजी रंगली.
अधिवेशनामध्ये बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांचा उल्लेख करताना आमचे मित्र, त्यांचे एक भावीचे स्वप्न आहे, असे म्हणत काही सेकंद थांबत विरोधी पक्षनेता होण्याचं ते पूर्ण होऊ दे, असे म्हणताच एकच हशा पिकला. यानंतर आ. सतेज पाटील यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच मंत्री मुश्रीफ मला शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून गेले. मला वाटलं ते ‘गोकुळ’साठी शुभेच्छा देतील; पण त्यांनी विरोधी पक्ष नेते पदासाठी शुभेच्छा दिल्या, असा उपहासात्मक टोला लगावला. तसेच, माजी आमदार प्रकाश आवाडे यांचाही राजकारणातील धुरंदर असा उल्लेख केला.
मी एकटाच काँग्रेसचा...
व्यासपीठावर सत्तेमधील दिग्गज आहेत. मी एकटाच काँग्रेसचा आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागत आहे. सगळे सत्तेमधीलच जवळ असून, चालत नाही, एखादा विरोधातील असणे गरजेचे असते. त्यात तो माझ्यासारखा असलेला बरा, असाही उल्लेख आ. सतेज पाटील यांनी त्यांच्या भाषणात केला.
मुख्यमंत्र्यांच्या यादीत आ. राहुल आवाडे
जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच; पण अलीकडे मुख्यमंत्री ज्यांचे ऐकतात त्या यादीमध्ये आमदार राहुल आवडे यांचे नाव आहे. त्यामुळे समाजाचे प्रश्न जलद गतीने सुटतील, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अधिवेशनात एकच हशा पिकला.