Kurundwad online fraud case
कुरुंदवाड : पेन्शन कार्डची नोंदणी करून देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १२ लाख ५६ हजार ८०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित गणपती सुर्यवंशी (वय ६२ वर्ष, व्यवसाय: शेती, रा. शेडशाळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अजित सुर्यवंशी यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरील व्यक्तीने 'पेन्शन कार्डचे रजिस्ट्रेशन' करून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने चलाखीने सुर्यवंशी यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डचा नंबर, कार्डमागील गुपित CVV नंबर आणि पिन नंबर मिळवला.
ही गोपनीय माहिती हाती लागताच, अज्ञात भामट्याने सुर्यवंशी यांच्या बँक खात्यातून तब्बल १२,५६,८०० रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम अचानक कमी झाल्याचे समजताच फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.