शिरोली एमआयडीसी : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व कोल्हापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अग्रणी शिरीष ऊर्फ प्रमोद विनायक सप्रे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी बुधवारी सकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सप्रे हे नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. परत येत असताना साडेसहाच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही कळण्यापूर्वीच ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले; पण तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दुपारी अडीच वाजता त्यांच्या नागाळा पार्क येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची एकुलती कन्या राजश्री सप्रे-जाधव यांनी त्यांना भडाग्नी दिला. यावेळी सप्रे कुटुंबातील पद्माकर सप्रे, अजय सप्रे, सतीश सप्रे, जावई अदित्य जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सप्रे यांचे आकस्मिक निधन झाल्याच्या वृत्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि कुटुंबीयांना धीर दिला. दैनिक 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. दुपारी निघालेल्या अंत्ययात्रेत व्ही. बी. पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, 'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे बाबासाहेब कोंडेकर, दिनेश बुधले, युवा उद्योजक यतीन जनवाडकर, वरुण जैन, संदीप पोरे, कुशल सामाणी, बिना जनवाडकर, आशा जैन, शिवाजी मोहिते, दिलीप मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सप्रे यांचे निकटवर्तीय व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील यश मेटालिक्स, सप्रे ऑटो अॅक्सेसरीज प्रा. लि. व सप्रे ऑटोकास्ट प्रा. लि. या कंपन्यांचे ते चेअरमन होते. औद्योगिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे काम होते. गुणीदास फाऊंडेशनचे ते अध्यक्ष होते. पद्मभूषण झाकीर हुसेन, राजन-साजन मिश्रा, हरिप्रसाद चौरसिया, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कवी सौमित्र तथा किशोर कदम अशा अनेक कलावंतांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. गुणीदास फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार व दिग्गज संगीतकार कोल्हापुरात आले. कोल्हापूरकरांना त्यांच्या कलेची मेजवानी शिरीष सप्रे आणि गुणीदास फाऊंडेशनने उपलब्ध करून दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी पंचाहत्तर हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली होती. आजवर ठिकठिकाणी त्यांनी दहा हजारांहून अधिक वृक्षारोपण केले आहे. शिरोली एमआयडीसीचे प्रवेशद्वार असणाऱ्या पहिला फाटा परिसरातील कचरा हटवून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात व प्रवेशद्वार सुशोभीकरण करण्यात सप्रे यांचे मोठे योगदान आहे. औद्योगिक क्षेत्रात त्यांची कामगिरी आणि व्यावसायिक सचोटीमुळे जीएसटी नियमित व चोख भरणारे उद्योजक म्हणून जीएसटी विभागानेही त्यांचा सन्मान केला. अमेरिकन कंपनी कॅटल फीलरने त्यांना गौरविले होते. ते अनेक मुलांना शालेय वस्तूंची मदत करत असत. नागाव या हातकणंगले येथील आदर्श विद्यालय येथील गोरगरीब मुलांना पावसाळ्यात शाळेत भिजत येताना पाहून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करून सामाजिक कार्यातील आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.