कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणेवर ठपका ठेवणारा प्राथमिक चौकशी अहवाल पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी सादर करण्यात आला. मंदिरातील चारही प्रवेशद्वारावर सोमवारी (दि.29) बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या सहायक फौजदारासह 12 पोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा भेदून मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राहुल चतुर्वेदी (रा. ठाणे) यांनी मंदिरात पिस्तूल नेल्याचा खळबळजनक प्रकार परवा उघड झाला होता.
अंबाबाई मंदिरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी दखल घेत शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. उपअधीक्षक पाटील यांनी सोमवारी सायंकाळी अंबाबाई मंदिरासह परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावरील नियुक्त अधिकार्यांसह पोलिसांचे जबाब नोंदविले. मंदिरातील मेटल डिटेक्टरचीही पाहणी केली. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत चौकशीची प्रक्रिया सुरू होती. चौकशीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आले. त्यामध्ये मंदिरातील सुरक्षा यंत्रणेतील निष्काळजीपणावर प्रामुख्याने ठपका ठेवण्यात आला आहे. सहायक फौजदारासह प्रवेशद्वारावरील नियुक्त प्रत्येकी 3 अशा एकूण 12 कर्मचार्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधितांच्या स्पष्टीकरणानंतर कारवाईबाबत निर्णय शक्य असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्यांसह बॉम्ब शोधक पथकाने अंबाबाई मंदिर परिसराची सकाळी पाहणी केली.
राहुल चतुर्वेदीसह दोघांवर गुन्हा : बंडा साळुंखेला अटक
सुरक्षा यंत्रणा भेदून अंबाबाई मंदिरात पिस्तूल नेऊन त्याचा व्हिडीओ स्वत: व्हायरल केल्याप्रकरणी राहुल चतुर्वेदी याच्यासह संभाजी ऊर्फ बंडा माधवराव साळुंखे (रा.धोत्रे गल्ली, कोल्हापूर) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार संगीता रघुनाथ विटे यांनी फिर्याद दाखल केली. दुपारी बंडा साळुखेला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची जामिनावर सुटका झाली. चतुर्वेदी याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.