कोल्हापूर : टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत झाला. तसेच याच दिवशी सकाळी 11 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, सर्व मनपा, खासगी उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शुक्रवारी मुख्याध्यापक संघ कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते. टीईटी परीक्षेत संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात अजून याचिका दाखल झालेली नाही. 15 मार्च 2024 या संच मान्यतेच्या आदेशामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. शिक्षण सेवक पद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांवर आज झालेल्या संघटना बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील, सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, प्रमोद तोंदकर, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक उपस्थित होते.