कोल्हापूर : शहरातील घरासमोर लावलेली क्यूआर कोडच्या पाट्या.  
कोल्हापूर

QR code attendance rule | क्यूआर कोड स्कॅन करा अन्यथा पगार कपात

मनपा प्रशासनाचे आरोग्य निरीक्षक, मुकादम, टिपरचालकांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

विनोद सावंत

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने शहरातील कचर्‍याचा उठाव व कचर्‍याचा संकलनाची माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोड यंत्रणा करण्यात आली आहे. शहरातील सर्व घरांवर, अपार्टमेंट, बंगल्यांच्या भिंतीवर क्यूआर कोडच्या पाट्या लावल्या आहेत. दोन वर्षे झाली, तरी याची अंमलबजावणी काही झाली नव्हती. आता मनपा प्रशासनाने कचरा उठावाचा विषय गांभीर्याने घेतला आहे. रोज किमान 500 घरांचे क्यूआर कोड स्कॅन करण्याचे बंधनकारक केले आहे. हे टार्गेट पूर्ण केले नाही, तर संबंधित आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि टिपर चालक यांचा त्या दिवसाचा पगार कपात होणार आहे. यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काढले आहेत.

राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत राज्यभरातील कचरा उठावाची यंत्रणा पारदर्शक होण्यासाठी 2023 मध्ये खासगी कंपनीची नेमणूक करून क्यूआर कोड असलेल्या पाट्या इमारतींची भिंतीवर बसविण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये कोल्हापूर शहराचाही समावेश होता. कोल्हापूर शहरातील सुमारे 1 लाख 67 हजार घरे, इमारतींवर या पाट्या लावल्या; परंतु दोन वर्षे झाले, तरी या पाट्या केवळ नावापुरत्याच लावल्याचे दिसत होत्या. हा उपक्रम राबवायचाच नव्हता तर क्यूआर कोडच्या पाट्या लावल्याच कशाला, अशी विचारणा नागरिकांकडून झाली.

याची गंभीर दखल मनपा प्रशासनाने घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घरावर लावलेले क्यूआर कोड स्कॅनिंगची सक्ती केली आहे. रोज किमान 500 घरांवरील क्यूआर कोड स्कॅन करण्याचे टार्गेट संबंधित कर्मचार्‍यांना दिले आहे. यामध्ये हायगय केल्यास संबंधित टिपरचालक, कर्मचार्‍यांसह आरोग्य निरीक्षक. मुकादमाचा त्या दिवसाचा पगार कपात केली जाईल, असे आदेश काढले आहेत. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

उपक्रमाचा फायदा

कचरा किती वाजता उचलला? तो किती होता? टीपरचालक जागेवर गेला आहे की नाही, हे समजणार आहे.

कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली

शहरातील गल्ली-बोळात टिपर जात नाही. चौकात थांबलेल्या टिपरमध्ये जाऊन नागरिक कचरा टाकतात. आता क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कर्मचार्‍यांना गल्लीत जावे लागणार आहे. सुका व ओला कचरा विलगीकरण केला आहे, हे मोबाईलमध्ये नमूद करावे लागणार आहे. यामध्ये त्यांचा अवधी जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT