कोल्हापूर : फॉरेक्स शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 10 ते 15 टक्क्यांपेक्षा जादा परतावा देण्याच्या आमिषाने फुलेवाडी, जिवबा नाना जाधव पार्कसह उपनगरातील गुंतवणूकदारांची एक कोटी रुपयांपेक्षा जादा रकमेची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जिवबा नाना जाधव पार्कमधील सागर मारुती माने (33) व स्नेहल सागर माने (31, सादगी बंगला, कारदगे हिल्स, कोल्हापूर) या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर फसगत झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच अनेक वयोवृद्ध गुंतवणूकदारांसह महिलांनी करवीर पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी सकाळी आक्रोश केला. याप्रकरणी फसगत झालेल्यांनी कागदपत्रांसह करवीर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे. सुनील मनोहर आंबेकर (54, रा. महालक्ष्मी पार्क, रिंगरोड फुलेवाडी, कोल्हापूर) यांनी संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदार ग्राहक संरक्षण (एमपीआयडी) कायद्यांतर्गत संशयित सागर माने व स्नेहल मानेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनील आंबेकर (29 लाख 80 हजार 500), संपुर्णा चंद्रकांत बेलेकर (25 लाख 27 हजार), संदेश चंद्रकांत बेलेकर (90 हजार), रवींद्र कृष्णा माळगे (9 लाख), सुनील मुकुंद मोरे (5 लाख 86 हजार), राहुल आनंदराव भोसले (16 लाख 61 हजार 500), संजय सदाशिव चव्हाण (13 लाख 20 हजार) अशी एकूण एक कोटी 55 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली.
माने दाम्पत्याने जिवबा नाना जाधव पार्कसह पाचगाव परिसरात फॉरेक्स शेअर ट्रेडिंगचे कार्यालय थाटले. त्यांनी गुंतवणुकीवर दरमहा 10 ते 15 टक्क्यांपर्यंत जादा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना 10 व 15 टक्क्यांनी परताव्याची रक्कमही दिली. त्यामुळे परिसरातील लोकांची गुंतवणुकीसाठी गर्दी होऊ लागली. आकर्षक कमिशनवर एजंटांची नियुक्ती करून शहरासह उपनगरातूनही कथित कंपनीकडे गुंतवणुकीचा ओघ वाढविल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
जानेवारी 2022 ते जुलै 2023 या काळात हा प्रकार घडला. जुलै 2023 पासून माने दाम्पत्याने परताव्यासह गुंतवलेली मूळ मुद्दल देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांत चलबिचल वाढली. गुंतवणूकदारांनी परतावा मिळण्यासाठी माने दाम्पत्याकडे तगादा सुरू केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर सुनील आंबेकरसह गुंतवणूकदारांनी माने दाम्पत्याविरुध्द फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पोलिस अधीक्षकांसह करवीर पोलिस ठाण्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माने दाम्पत्याला अटक करण्याचे आदेश दिले.