कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला झालेली विराट गर्दी.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

kolhapur | खोट्या दाखल्यावर निवडून आलेल्यांची पदे रद्द करा

एससी आरक्षण बचाव समितीची विराट मोर्चाद्वारे मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अधिकाराचा गैरवापर करणार्‍या आणि अर्थपूर्ण व्यवहार करून अनुसूचित जातीचे (एससी) खोटे दाखले देणार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करा आणि त्यांना तत्काळ निलंबित करा. बनावट दाखले काढून निवडणूक लढवणार्‍या व्यक्तींचे दाखले आणि सदस्यत्व रद्द करा. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, या मागणींसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांनी सोमवारी भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.

बिंदू चौकातून दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत- बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चात ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘हम सब एक है’, ‘भ्रष्ट अधिकार्‍यांचा धिक्कार असो’, ‘खोटे जातीचे दाखले देणार्‍या अधिकार्‍यांचे करायचे काय? खाली डोकं वर पाय’... अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात आरक्षित जागांवर खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडून आलेल्यांची पदे तत्काळ रद्द करा व बोगस दाखले देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी आजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वास कदम, शिवाजीराव कवाळे, डी. जी. भास्कर, सुभाष रामुगडे, सुभाष देसाई, प्रमोद कदम, विशाल देवकुळे, रघुनाथ मांडरे, लालासाहेब नाईक, प्रेमानंद मौर्य, जनार्धन गायकवाड, रघुनाथ कांबळे, बबनराव रानगे, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, बाजीराव नाईक यांच्यासह एससी, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकालांवर टांगती तलवार

या मोर्चामुळे आता खोटी जात प्रमाणपत्रे सादर करून जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका लढवणार्‍या संबंधित पदाधिकार्‍यांच्या निवडणूक निकालांवर टांगती तलवार आहे.

SCROLL FOR NEXT